Daund News : पुणे : दौंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्याहून बारामती मार्गे पैठणला निघालेल्या सातारा-पैठण एसटीच्या कंडक्टरवर (वाहक) प्रवाशाने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत कंडक्टर गंभीर जखमी झाला आहे. दत्ता संतराम कुटे (रा. कुटेवाडी, बोरफडी) या वाहकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. हरून इकबाल कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, बारामती) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रवाशाचे नाव असून, या प्रकरणात आरोपी कुरेशी याचाही हात मोडल्याचे समोर आले आहे. कुटे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रवाशी हरून इकबाल कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंडमध्ये खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी १०.४५ वाजण्याच्या सुमारास एसटी दौंड येथील गोल राऊंड येथून नगरमोरी चौकात जात असताना ही घटना घडली. फिर्यादी पैठण डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. (Daund News) बारामतीहून निघालेली सातारा-पैठण गाडी दौंड मार्गे जात असताना, कुरकुंभ घाटाच्या खाली एक एसटी बंद पडलेली दिसल्याने चालकाने गाडी थांबविली व त्या बंद पडलेल्या एसटीमधील प्रवासी आपल्या एसटीमध्ये घेतले. प्रवाशांना दौंड शहरातील गोल राऊंड येथील थांब्यावर उतरविले.
दरम्यान, प्रवासी उतरल्यानंतर एसटी पुढे जात असताना कंडक्टरनी प्रवासी मोजले असता एसटीमध्ये एक प्रवासी जास्त असल्याचे निदर्शनास आले. म्हणून त्यांनी प्रवाशांची तिकिटे तपासली तेव्हा प्रवासी हरून कुरेशी याच्याकडे गोल राऊंड पर्यंतचेच तिकीट असल्याचे त्यांना समजले. (Daund News) वाहकाने कुरेशी याला तुमचा स्टॉप तर मागेच गेल्याचे सांगितले. कुरेशी याने मला पुढे नगरमोरी येथे उतरायचे असल्याचे सांगितले. वाहकाने त्याला पुढचे तिकीट घ्यावे लागेल असे म्हणताच त्याने वाहकाशी वाद घालायला सुरुवात केली. यातच शिवीगाळ करीत मारहाण केली.
या हल्ल्यात वाहकाच्या ओठाला जखम झाली. काही प्रवासी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपीकडून दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली. (Daund News) हा प्रकार दौंडमध्ये घडला. या प्रकरणी एसटी वाहक दत्ता संतराम कुटे यांनी दौंड पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली. कुटे यांच्या तक्रारीवरून आरोपी हरून इकबाल कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर चालकाने बस थेट दौंड पोलीस स्टेशनला आणली. प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कुरेशी विरोधात, सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अबनावे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राहू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांचे धडे
Daund News : ‘महिला सन्मान बचतपत्र’ योजनेत अवघ्या तीन दिवसांत उघडली 10,430 खाती