Pune News : पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर गर्दुल्यांनी कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी पुण्यातील वर्दळीच्या टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
तिघांना अटक
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी यल्लाप्पा आरोटे (वय १९, रा. नांदेड. सध्या रा. हत्ती गणपती, सदाशिव पेठ) याने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील असून, तो काही महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला होता. मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन तो रहात होता.
दरम्यान, फिर्यादी तरुण अभ्यासासाठी नेहमी सदाशिव पेठ येथील अभ्यासिकेत जात असे. सदशिव पेठेतील अनेक अभ्यासिका रात्रीही सुरू असतात. तिघे मित्र अभ्यास करून पहाटे दुचाकीवरून घरी निघाले होते. टिळक रस्त्यावरील एका स्पोर्ट्सच्या दुकानासमोर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यापैकी एकाने त्याला पकडून बाजूला नेले. त्यानंतर गाडीतील कोयता काढून त्यांच्या डोक्यात वार केला. त्याने वार हुकवला.
या अनपेक्षित घटनेमुळे बालाजी आणि मित्रांनी पोलीस चौकीत धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.