Pune News लोणी काळभोर, (पुणे) : ग्रामीण भागात वाहतूक सुरक्षेबाबत प्रभावी कारवाई होत नसल्याने, (Pune News) कर्णकर्कश हॉर्न वाजवत धुम स्टाईल धावणारे दुचाकीस्वार, फॅन्सी नंबरप्लेटचा वापर करणारी मंडळी, पोलीस, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, प्रेस आदी फलक आपल्या खासगी वाहनांवर झळकवणारे महाभाग पोलीस तसेच संबंधित विभागाच्या नाकावर टिच्चून परिसरात उजळ माथ्याने वावरत आहेत. (Pune News)
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी वाहने उपलब्ध करून देते. मात्र, या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक तसेच परिचित मंडळी आपल्या खासगी वाहनांवर सरकारी नावाच्या पाट्या लावून, सर्रास दुरुपयोग करताना दिसून येतात. पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात परिवहन व पोलीस प्रशासनाने यावर योग्य पाऊले उचलून संबधित गाड्यांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नियम डावलून गैरवापर सुरूच…
सोलापूर महामार्गावर अनेक खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’, ‘अत्यावश्यक सेवा’, ‘प्रेस’ अशी नावे लिहिलेल्या पाट्यांचा वापर काही अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून सर्रास होताना दिसत आहे. अशा पाट्या लावता येणार नसल्याचे यापूर्वीच प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर केले आहे. तरिही नियम डावलून गैरवापर सुरच आहे. यामुळे बऱ्याचदा टोलनाके, सार्वजनिक पार्किंग किंवा इतर ठिकाणी वाद उद्भवतात. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, चारचाकी वाहनांवर देखील ‘प्रेस’, ‘पोलिस’ यांच्या नावाचा अवैध वापर वाढला आहे.
अनधिकृत पाट्यांच्या प्रमाणात वाढ ..
सरकारने सरकारी वाहने पुरवून देखील सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून खासगी वाहनांचा वापर सरकारी वाहन म्हणून केला जातो. यासाठी अनधिकृत पाट्या, लोगो यांचा वापर वाढला आहे. अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करून चाप बसावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने ओळखपत्र पुरविले असताना देखील वाहनांवर अनधिकृत पाट्या लावण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांकडून देखील या नावाच्या पाट्यांचा वापर होण्याची शक्यता असते, यामुळे परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करून अनधिकृत पाट्यांचा होणारा वापर थांबवावा, अशी मागणी होत आहे.
पोलीस या पाटीचा गैरवापर…
दरम्यान, सर्व नागरिकांना समान कायदा या तत्त्वानुसार पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे, हे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे ‘पोलीस’ पाटी लावलेली वाहने नाकाबंदी व सुरक्षा तपासणी न होता सोडतात. यामुळे पोलीस या पाटीचा गैरवापर होऊन नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलीस अधिकारी व कर्मचारी ‘पोलीस’ असे लिहितात. पोलिसांचा लोगो असलेले स्टीकर लावतात. अनेकदा पोलिसांव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांकडून पोलिसाच्या नावाचा गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. वाहतूक पोलिसांनी विचारणा केल्यास त्यांच्या नातेवाईकांना फोन केल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
पत्रकाराच्या नावाखाली पोलिसांशी हुज्जत…
सोलापूर महामार्गावर एका रिक्षाचालकाने एका मोठ्या गावात चौकात रिक्षा लावली होती. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने रिक्षा काढण्यास सांगितले. यावर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाशी दारूच्या नशेत हुज्जत घातली. मी पत्रकार आहे, मी रिक्षा काढणार नाही, अशी अरेरावीची भाषा वापरली. ही घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिकृत ओळखपत्र आहे का, ते किती खरे आणि खोटे याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पोलीस विभागातील मनुष्यबळ अल्प असून मोजक्याच आधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भिस्त असल्याची चर्चा आहे. यामुळे पोलीस कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनावर पोलीस, पत्रकार, महाराष्ट्र सरकार किंवा तत्सम नावांची पाटी वा स्टिकर असतील तर ते काढून टाकावेत, अन्यथा संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरटीओच्या नियमाप्रमाणे खाजगी वाहनांवर अशा प्रकारे नाव वापरणे हा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आता संबंधित विभागाकडून अशा वाहनांवर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले, “पुणे शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’, ‘अत्यावश्यक सेवा’, ‘प्रेस’ अशी नावे लिहिलेली वाहने आढळून येत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठा “ड्राईव्ह” हाती घेतला जाणार आहे. तसेच ‘महाराष्ट्र शासन’, ‘पोलिस’, ‘प्रेस’ असे लिहिलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांना देण्यात येणार आहेत. तसेच या “ड्राईव्हनंतरही” असे शब्द लिहिलेली वाहने सीसीटीव्हीमध्ये आढळून आल्यास संबंधित वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहेत.