Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर माथेपिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केला. या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरूणांनी धाडसाने तिला वाचवले. या दोन्ही तरुणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.(Pune News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
माथेपिरू तरुण कोयता हातात घेऊन तरुणीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. ती युवती जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळत होती. भर रस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे (रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि त्याचा मित्र हर्षल पाटील याने जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.(Pune News)
दरम्यान, तरुणीला वाचवल्याबद्दल लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचं कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फोनद्वारे केले. भाजपा आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून त्यांनी या दोन तरुणांशी संवाद साधला. यावेळी जवळगे यानेही आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या जवळगे आणि पाटील यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.(Pune News)
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापुरात असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पुण्यात तरुणीचे प्राण वाचविणाऱ्या दोघा तरुणांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी एक लाखाची नव्हे तर पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले. ही माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.(Pune News)