Pune News : पिंपरी, (पुणे) : इंद्रायणी नदी लगत असलेल्या इंद्रायणी वाटिका या इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डकमधून पडून अडीच वर्षाच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. २७) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास देहू (ता. हवेली) येथे हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे.
शोकाचे वातावरण
रमेश मारुती लगड (वय ३४, रा. इंद्रायणी वाटिका, देहू, मूळगाव पिंपळसुटी, ता. शिरूर, पुणे) आणि अडीच वर्षांची मुलगी श्रेया अशी मृतांची नावे आहेत. डक्ट जवळ खेळताना अचानक तोल गेला आणि आठव्या मजल्यावरून घसरले त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून रमेश लगड हे कुटुंबासमवेत इंद्रायणी वाटिका या इमारतीत वास्तव्यास आहेत. या इमारतीत त्यांची स्वतःची सदनिका देखील आहे. रमेश हे त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यासोबत या ठिकाणी रहात होते. रमेश लगड हे लष्कराच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपोत (सीओडी) नोकरीला होते.
सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश हे आपल्या मुलीसोबत इमारतीखाली खेळत होते. खेळून झाल्यानंतर ते त्यांच्या घरी आठव्या मजल्यावर गेले. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास डक्टजवळ खेळत असताना आठव्या मजल्यावरून घसरून ते डक्टमध्ये पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता. Pune News
या घटनेचा पत्नीला धक्का सहन न झाल्याने त्यांची पत्नी देखील जागेवरच बेशुद्ध झाली होती. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.