Pune News : पुणे : दिव्यांग मुलीला कामासंबंधी चर्चा करण्यासाठी कार्यालयात बोलवून, तिला कायमस्वरूपी वेतनश्रेणीवर कामावर घेण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे तत्कालीन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने बंडगार्डन पोलिसांना दिला आहे.
विनयभंग केल्याची धक्कादायक घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामासंबंधी अधिक चर्चा करण्यासाठी डॉ. विधाते यांनी मुलीला त्यांच्या कार्यालयात बोलविले आणि तिचा विनयभंग केला. दरम्यान, डॉ. विधाते यांनी पैशांसोबतच शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात केली होती. बंडगार्डन पोलिसांनी ही तक्रार जिल्हा परिषदेतील विशाखा समितीकडे पाठवून त्याचा अहवाल मागितला होता. मात्र, गुन्हा दाखल न झाल्याने मुलीने अॅड. तौसिफ शेख आणि अॅड. क्रांतीलाल सहाणे यांच्यामार्फत न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने डॉ. विधाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी. चौकशीचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असा आदेश दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशेला पाटील यांनी हा आदेश दिला आहे.