Pune News : पुणे : कोंढवा परिसरात ढोल ताशा पथकात सराव करत असलेल्या एका १६ वर्षीय मुलाचे अपहरण करुन, त्याचा सासवड परिसरात खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
११ जणांवर गुन्हा दाखल
टोळीयुद्धातून हा खून झाल्याची माहिती मिळत आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती दिल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलाचा टोळक्याने खून केल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून उघडकीला आली आहे. याप्रकरणी दोन सराइतांना पोलिसांनी अटक केली आहे. साईराज लोणकर (वय २५, रा. कोंढवा खुर्द), ओंकार कापरे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर, कापरे हे सराईत गुन्हेगार आहेत. अल्पवयीन मुलगा कोंढवा येथील शिवनेरीनगर भागात वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. २) तो ढोल ताशा पथकात सरावासाठी गेला होता. मात्र, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा सापडला नाही. अखेर रविवारी त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोंढवा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा अल्पवयीन मुलाबरोबर गेलेला एकजण बेपत्ता झाला असून, तो कोंढव्यातील घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या पायाला जखम झाली होती. त्याच्याकडे चौकशई केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
लोणकर आणि कापरे यांनी अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याला सासवडला घेऊन गेले. तेथे त्याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात मिळाली. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.