विशाल कदम
Pune News | पुणे- पुणे शहर पोलिस दलातील कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्यासह युनिट पाचच्या हद्दीतील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील कांही दिवसापासुन मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. अवैध धंद्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करण्याऐवजी ‘हप्ता वसूल‘ करण्यात मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहर पोलिस दलातील दोन वरीष्ठ अधिकारी वगळता, तब्बल चौदा बड्या अधिकाऱ्यांच्या नावे पोलिस दलातील “कलेक्टर” मंडळी वसुली करत असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.
महिन्याला कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक उलाढालीची चर्चा…
कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्यासह युनिट पाच च्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालु असलेल्या शेकडो अवैध धंदेवाल्यांच्याकडुन पोलिस दलातील “कलेक्टर” मंडळी पोलिस दलातील बडे अधिकारी व पोलिसांच्या विविध शाखांची नावे सांगुन महिन्याला १० कोटीहुन अधिक रकमेची वसुली करत असल्याची चर्चा खाजगीत सुरु आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी अवैध धंदे प्रकरणात लक्ष घालुन कारवाई करणार का? याकडे पुणे शहरातील सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष लागुन राहिले आहे.
पुण्याचे तत्कालिन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली होताच, पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु झाला आहे. शहरातील ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू राजरोसपणे सुरु आहेत. दारु विक्री तसेच खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरुच असल्याचे चित्र आहे. अवैध धंदे दारू, जुगार, मटका या अवैध धंद्याचा सुळसुळाट जोमाने चालु आहे.
पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा सुरु आहे. शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, वाहनचोरी, घरफोडी, लूटमार, हाणामाऱ्या, या घटना नित्याच्याच झाल्याचे दिसुन येत आहे. अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न कायमच सतावत आहे.
वसुलीसाठी तब्बल 14 हुन अधिक कलेक्टर कामाला…
कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्यासह युनिट पाच च्या हद्दीत अवैध धंदे खुलेआम सुरू असूनही ”पोलीस प्रशासनाची हाताची घडी अन् तोंडावर बोट” आहे. अवैध धंदे स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरु असुन पोलीस कर्मचारी हप्ते घेत असल्याचीही खमंग चर्चा शहरात आहे.
एवढे असतांनाही सर्वच वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अवैध धंद्यांवर दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. शहर पोलिस दलातील दोन वरीष्ठ अधिकारी वगळता, तब्बल चौदा अधिकाऱ्यांच्या नावे अवैध धंदेवाल्याकडुन 14 हुन अधिक “कलेक्टर” मार्फत अवैध धंदे वाल्यांच्याकडुन वसुली सुरु आहे. अमुक-तमुक साहेबांचा मानुस असुन, त्यांच्यासाठी वसुली करतो असे सांगत अनेक जण मागील कांही दिवसापासुन अवैध धंदेवाल्याकडुन कोट्यवधी रुपयांची वसुली करत आहेत. हप्ते वसुलीसाठी येणारे कलेक्टर, त्यांची मग्रुरीची भाषा, त्यांच्या उंच गाड्या पाहता, ”चहापेक्षा किटली गरम” अशीच अवस्था पहायला मिळत आहे.
जमिनीच्या प्रकरणांमध्ये वाढता हस्तक्षेप…
पुण्याचे तत्कालिन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाल्यापासुन मागील वरीष्ठ अधिकारी व पोलीस ठाण्यातील कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा जमिनविषयक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप वाढलेला दिसून येत आहे. प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना एखाद्याची बाजू घेऊन दुसऱ्यावर अन्याय केला जात आहे.
कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका वरीष्ठ अधिकाऱ्यासह स्थानिक पोलिसांनीच एका प्रकरणात जमिनाचा ताबा देण्यासाठी एकावर अन्याय केल्याचे प्रकरण मागील तीन महिण्यापासुन पेंडींग आहे. पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णीक यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देऊनही, कोंढवा पोलिसांनी जमिनीच्या प्रकरणात अद्यापही ठोस भुमिका घेतल्याचे दिसुन येत नाही. तक्रारदाराचा जबाब घेऊन, प्रकरण कसे थंड करता येईल. याकडेच कोंढवा पोलिस पाहत असल्याचे दिसुन येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…