Pune News : पुणे : पार्टनरशिप करुन फुटवेअर कंपनीत करोडोंची गुंतवणूक केली. त्याबदल्यात शेअर्स सर्टिफिकेट देऊन करारनामाही करण्यात आला. मात्र, कोणताही परतावा न देता, कराराचा भंग करुन पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये राहणार्या एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्याची १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत घडत आहे.
१ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक
याप्रकरणी मिळआलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी ७५ वर्षीय सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी असून, त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश वसंतराव कारंडे (वय ५७), निलेश वसंतराव कारंडे यांच्यासह ३ महिलांवर (सर्व रा. मॉडेल कॉलनी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने स्वतःच्या कास फुटवेअर प्रा. लि. या कंपनीत त्यांना गुंतवणुक करण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर, विश्वास बसण्यासाठी त्याने फिर्यादीच्या मुलाबरोबर पार्टनरशिप केली. त्यानंतर त्यांना कंपनीत १ कोटी ५५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीपोटी पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली. शेअर्स सर्टिफिकेटही देऊन करारनामा करण्यात आला.
दरम्यान, या सर्व प्रक्रीयेनंतर राजेश कारंडे व इतरांनी फिर्यादी यांचे शेअर्स परस्पर ट्रान्सफर केले. परतावा म्हणून त्यांना दिलेले धनादेश परत आले, त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. फिर्यादीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जानकर करीत आहेत.