Pune News : पुणे : सेना दलाची बनावट प्रमाणपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असतानाच पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला आहे. जम्मू काश्मिरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी घेऊन, बनावट शस्त्र परवाना बाळगून टोलनाक्यावर सुरक्षारक्षकाची नोकरी करणाऱ्या उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील ८ जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, ५६ काडतुसे, १२ बोअरची बंदूक, ३ बनावट शस्त्र परवाने असा एकूण ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिस्तूल, बंदुकीसह ५६ काडतुसे जप्त
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संतोष जैनाथ शुक्ला (वय ५० रा. भागीरथी नगर, साडेसतरा नळी, हडपसर, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश), रामप्रसाद बुद्धा पासवान (वय ३५, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल, जि. रायगड, मूळ रा. फतेहपूर उत्तर प्रदेश), राजेश बबलू पासवान (वय ३५, रा. फतेहपूर, अशोकनगर, उत्तरप्रदेश), दिनेश जगदीश पासवान (वय ५४, रा. गोपीपूर, उत्तर प्रदेश), इम्रान मोहमद जिमी खान (वय ३०, रा. राजोरी, जम्मूकाश्मिर), मोहंमद बिलाल मोहंमद निसार (वय ३०, रा. मंजापूर, जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर), साहिलकुमार चमनलाल शर्मा (वय २५, रा. राजोरी, जम्मू काश्मीर), गीतम देशराय शर्मा (वय २३, रा. राजोरी, जम्मू काश्मीर) अशी अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरातून वानवडी पोलिसांनी जुलै महिन्यात संतोष शुक्ला याला पेट्रोलींग दरम्यान अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याच्या इतर साथिदारांकडे बंदुक असून त्यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याचे सांगितले होते. (Pune News) वानवडी पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरातील टोलनाक्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्यांना ताब्यात घेऊन तपास केला. तपासादरम्यान त्यांच्याकडे असलेले शस्त्र परवाने बनावट असल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडील शस्त्र परवाने तपासले तेव्हा शस्त्र परवान्यावर जम्मू काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे उघडकीस आले. (Pune News) पोलिसांनी आरोपींच्या घराची तपासणी करुन, १२ बोअरची बंदूक, ५६ काडतुसे, तीन बनावट शस्त्र परवाने जप्त केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! पुण्यातील मुक्तांगण शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार
Pune News : विजयादशमीच्या मुहूर्तावर शरद पवार घेणार पुण्यात सभा?
Pune News : चिमुकलीच्या तोंडावर लघुशंका करुन विनयभंग; नऱ्हेगावातील घटना