पुणे : मुलीला मारहाण करून गेली 7 वर्षापासून बलात्कार करणाऱ्या आरोपी बापाची बलात्कार आणि मारहाणीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राजगुरुनगर, खेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. पी. पोळ यांच्या कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड.नितीन भालेराव यांनी दिली. किसन शिंदे असे निर्दोष मुक्त झालेल्या आरोपी बापाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर २०१५ रोजी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी किसन शिंदे याच्यावर ७ वर्षापासून बळजबरी बलात्कार आणि मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास खडक पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याने सदर गुन्ह्याचा तपास राजगुरुनगर पोलिसांकडे देण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपीस अटक करुन आरोपी विरुद्ध दोषरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर सदर केसमध्ये सरकारपक्षातर्फे एकूण ६ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. आरोपी तर्फे ॲड.नितीन भालेराव यांनी काम पाहिले. सदर केसमध्ये फिर्यादीचे तिच्या आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्न करायचे होते. परंतु, या प्रेमविवाहाला वडिलांचा विरोध होता, त्यामुळे आरोपीला आत्याच्या मुलानेच खोट्या गुन्ह्यात गोवले असल्याचा पुरावा आरोपी पक्षातर्फे न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता.
दरम्यान, आरोपीपक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून राजगुरूनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.पोळ यांच्या न्यायालयाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने आरोपी किसन शिंदे यास निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारीत केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड.नितीन भालेराव यांनी दिली, यावेळी त्यांना ॲड.मयुर चौधरी, ॲड.दिपक खेडकर, ॲड स्वप्नील क्षीरसागर यांनी मदत केली.