लोणीकंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या वाघोली (ता. हवेली) येथील टोळीप्रमुखाला २ वर्ष तर त्याच्या साथीदाराला लोणीकंद पोलिसांनी १ वर्षासाठी जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.
दत्ता रंगनाथ गायकवाड (वय-२४, रा. लेन नं. ११ दुबेनगर वाघोली ता. हवेली (टोळी प्रमुख), चेतन ऊर्फ आप्पा ग्यानोबा देवकुळे, (वय २२, रा. जे.जे. नगर लेन नं. ०६ वाघोली ता. हवेली) अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन दोघांना तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, केसनंद तसेच चंदननगर भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, लुटमार करणाऱ्या गंभीर दुखापत, घातक शस्त्र वापरुन दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने दत्ता गायकवाड व चेतन देवकुळे याच्यावर सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत टोळीप्रमुख व त्याचे साथीदार इसम यांचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांना प्रस्ताव पाठविला असता, रोहिदास पवार यांनी सदर सराईतांपैकी टोळी प्रमखास ०२ वर्षाकरीता व टोळी सदस्यास ०१ वर्षाकरीता पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, अमोल भोसले, विजय आवाळे, कुणाल सरडे, बापु जाधव यांनी केली आहे.