Pune Crime | जुन्नर, (पुणे) : तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीने किरकोळ कारणावरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीतील नवलेमळा या भागात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमनाथ संभाजी कुलाळ (वय – २५) व मनीषा सोमनाथ कुलाळ (वय – २०) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि मनीषा कुलाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर गेल्या तीन महिन्यांपासून कुलाळ हे मेंढपाळ दांपत्य मेंढ्यांसह पिंपरी पेंढार गावाच्या नवलेवाडी परिसरात वास्तव्यास होते.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातूनच त्यांनी आपले जीवन संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रहात असलेल्या काही अंतरावरच ती विहीर आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सोमनाथ कुलाळ आणि मनीषा कुलाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि नुकत्याच सुरु झालेल्या संसाराची अखेर अंत झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!