Pune Crime पुणे : वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी बसच्या काचा फोडून चालक आणि वाहकाला एका माथेफिरूने मारहाण करून बसमध्ये गोंधळ घालून दहशत पसरविल्याची घटना पाटील इस्टेटसमोर घडली आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जलपालसिंग जुन्नी (वय १९, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एसटीचालक बाळासाहेब वारे (वय ४३, रा. शिरूर कासार, जि. बीड) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी वारे हे राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून काम करतात. ते मंगळवारी रात्री पैठण ते पुणे ही बस घेऊन पुण्यात आले होते. वाकडेवाडी येथील बस स्थानकात ते बस घेऊन गेले. बस परतीच्या प्रवासासाठी रात्री साडेदहा वाजता निघाली. वाकडेवाडीकडून संगमवाडीकडे जात असताना पुलाजवळ वाहतूक कोंडीमुळे बस थांबली होती.
या वेळी आरोपी जलपालसिंगने बसच्या समोरील काचा फोडल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने चालक, वाहक आणि प्रवाशी गोंधळले. चालक वारे आणि वाहक अनिस शेख यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता आरोपीने बसच्या डाव्या बाजूच्या तीन काचा फोडल्या. आरोपीने बसमध्ये घुसून दमदाटी केली. चालक वारे, वाहक शेख आणि प्रवाशांना धक्काबुक्की करून ढकलून दिले.
दरम्यान, ‘कोणी मध्ये आल्यास कापून टाकेन’ अशी धमकी त्याने दिली. याघटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.