Pune Crime news : पुणे : ऑनलाइन पेमेंट कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक करणाऱ्या 2 सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी आणि आयुब बशिर आलम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इझी-पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक झाली होती. यात त्यांचा हात होता. नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनी आहे.
याबाबत पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इझी-पे चे नोंदणीकृत एजंटांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. या कंपनीतील नोंदणीकृत एजंटांपैकी 65 जणांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅपव्दारे कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले होते. आरोपींनी अनधिकृत मोबाईल संचांद्वारे कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. तसेच कंपनीच्या खात्यामधून एजंटच्या कमिशनव्यतिरिक्त तीन कोटी 52 लाख 70 हजार रुपयांची रक्कम इतर 44 बँक खात्यांत जमा केली.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी 2 आरोपींना आधीच अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुणे सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. परंतु आरोपी दिल्ली, बिहार येथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा माग काढत अन्सारी आणि आलम या दोघांना कोलकतामधून ताब्यात घेतले. न्यायालयाने या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे शहरात आठ महिन्यात गुन्ह्यांची किती प्रकरणे?
मनी ट्रान्स्फर – 56, केवायसी अपडेट – 42, क्रिप्टोकरन्सी – 58, इन्शुरन्स फसवणूक- 10, जॉब फसवणूक-31, शेअर मार्केट फ्रॉड- 27, लोन फ्रॉड- 29, ऑनलाईन सेल आणि परचेस फ्रॉड-62, फेक प्रोफाईल- 85, फेसबुक हॅकिंग- 34, सेक्सटॉर्शन- 35 पुणे शहरात या आठ महिन्यात गुन्ह्यांची किती प्रकरणे आढळली आहेत.