तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने चार ठिकाणी, गोळीबार करणाऱ्या सहा जणांवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (ता. 20) सायंकाळच्या वेळी चार ठिकाणी हा गोळीबार केला होता.
रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (रा. शिवाजी चौक, तळेगाव स्टेशन), विकी खराडे आणि अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आनंद मोहिते यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिक्या शिंदे यांनी त्याच्या साथीदारांसोबत मिळवून तळेगाव दाभाडे शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक या ठिकाणी गोळीबार केला. आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हा गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासून त्यानुसार आरोपींचा माग काढला. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.