पुणे : पुर्ववैमन्यासातून ‘मोक्का’तील गुन्हेगाराचा पाठलाग करून दोन दुचाकीवर आलेल्या अज्ञात चौघांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
नंदू जाधव (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू जाधव हा गुन्हेगार असून, त्याच्यावर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. मोक्काच्या गुन्ह्यात तो नुकताच जामीनावर बाहेर आला होता. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास नंदू जाधव हा कर्वेरस्त्यावरील पीएनजी ज्वेलर्स येथून रस्ता क्रॉसकरून जात होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी पाठीमागून त्याचा पाठलाग करत डोक्यात सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले असून, दोन दुचाकीवर चौघेजण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, शहरात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडत असताना चोरट्यांनी सहा फ्लॅट फोडले. तर, दत्तवाडी अन् कोथरूडला सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यातच आता मध्यरात्री खूनाचा थरार घडला आहे.