पुणे : पूर्ववैमनस्याच्या वादातून एका तडीपार गुंडाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तीन जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना कोंढवा (पुणे) परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३ जणांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमीत ऊर्फ काकासाहेब जाधव (रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत ऊर्फ काकासाहेब जाधव हा काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अशोका म्युज सोसायटीजवळून चालला होता. तेव्हा तिघांनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. आणि आरोपी सदर ठिकाणाहून फरार झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी सुमीत जाधवला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, सुमीतचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
परिमंडळ ५ च्या तत्कालीन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये आरोपी सुमीत जाधव याला २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.
त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे अशा प्रकारचे ८ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानुसार त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती.
परंतु, त्याची गुन्हेगारी सुरुच राहिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तडीपार करून अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे सोडण्यात आले होते.