पुणे : पुणे शहर पोलिस दलातील फरासखाना, समर्थ व चंदननगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत मुंढव्यातील हॉटेलमध्ये धिंगाणा केल्याप्रकरणी ३ कर्मचार्यांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश मरीस्वामी मठपती (वय-२९, रा. सदानंद नगर, सोमवार पेठ, पोलिस अमंलदार फरासखाना पोलिस ठाणे), अमित सुरेश जाधव (वय-३७, रा. भवानी पेठ, पोलिस लाईन, पोलिस अंमलदार नेमणुक समर्थ वाहतुक विभाग, पुणे शहर), योगेश भगवान गायकवाड (वय- ३२, रा. मातोश्री बिल्डींग, गणपती मंदिर समोर, लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा पोलिस अंमलदार नेमणुक चंदननगर पोलिस ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी कुनाल दशरथ मद्रे (वय-२७, धंदा, मेट्रो लॉऊज हॉटेल मॅनेजर, रा. आगवाली चाळ, लेन नं. ३, गणपती मंदिर बाजुला, घोरपडी गाव) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २१) मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास कुनाल मद्रे हे हॉटेल मेट्रो बंद करून आवरा आवरीचे काम करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार उमेश मठपती, अमित जाधव आणि योगेश गायकवाड हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी बार काऊन्टरवर दारू पिऊन आणखी दारूची मागणी केली.
तसेच त्यांनी रोहित काटकर याला हाताने मारहाण करून मोठ मोठयाने शिवीगाळ केली.धमकी देऊन हॉटेलमधील बार काऊंटरवर दारू पिऊन धिंगाना केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे आणि उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आश्विनी भोसले करीत आहेत.