पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’त महाराष्ट्रातील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील विद्यालयांचा गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्लिक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.
या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-१९ च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मूल्यांकन झाले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.