पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे ५ लाखाची खंडणीची मागणी, आणि खंडणी न दिल्यास दिर माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली.
इम्रान समीर शेख,( रा. ७९, विकासनगर, घोरपडी गाव, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ बाबा मिसाळ (रा. लष्कर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी मिसाळ भाजपाच्या विद्यमान आमदार आहेत. त्यांचे नागरिकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय आहे. मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर आरोपी इम्रान शेख याने खंडणीसाठी मेसेज केले आहेत. या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन-तीन आणि पाच लाख रुपयांची वारंवार मागणी केली. हे पैसे न दिल्यास माधुरी मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने शेख दररोज मेसेज करून आमदार मिसाळ यांना त्रास देत होता. तसेच आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी दीपक मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, आरोपी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी शेख तेलंगणात पसार झाला होता. बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
हि कारवाई बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांच्या पथकाने केली आहे.