Pune Big Breaking पुणे : गणेशाची मूर्ती घराबाहेर बसवली म्हणून सोसायटीने दाम्पत्याला तब्बल ५ लाख ६२ हजारांचा दंड ठोठाविल्याचा धक्कादायक प्रकार वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटीमध्ये उघडकीस आहे. (Pune Big Breaking)
सतीश होनावर व संध्या होनावर अशी दंड ठोठाविण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, होनावर दाम्पत्याने वानवडी भागात फ्लॉवर व्हॅली या सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर घर सन २००२ साली खरेदी केले होते. घर खरेदी केल्यावर त्यांनी वास्तूशांती केली, घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली. त्यानंतर सन २००५ मध्ये सोसायटी रजिस्टर करण्यात आली. मात्र या सोसायटीने २०१९ साली कुठल्याही फ्लॅट धारकाने घराच्या बाहेर शू रॅक, कुठल्याही मूर्ती, फिश टँक,फुलदाणी ठेऊ नये, असा नियम जारी केला होता.
दरम्यान, होनावर दाम्पत्याने कागदापासून बनविलेली गणपती बाप्पांची तीन ते साडेतीन फुटांची मूर्ती घराबाहेर ठेवली. मूर्ती घराबाहेर ठेवल्यामुळे आता या दाम्पत्याला सोसायटीने ५ लाख ६२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, आता हे प्रकरण थेट कोर्टात जावून पोहचले आहे.
सतिश होनावर सोसायटीचे सदस्य असून २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये ते सोसायटीचे अध्यक्ष होते. मात्र त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर २०१९ साली सोसायटीवर नवीन मंडळ स्थापन झाले आणि त्यानंतर नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली.
नव्या सोसायटी कमिटीने कुठलीही वस्तू घराबाहेर ठेवली तर शासनाच्या नियमानुसार महिन्याच्या टॅक्सच्या पाच पट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल,असा निर्णय घेतला. त्यानंतर सोसायटीने होनावर यांना २०१९ मध्ये नोटीस पाठवली. सोसायटीने दाम्पत्याला घराबाहेर बसविलेली गणपती बाप्पाची मूर्ती काढून टाका, अशा आशयाची नोटीस पाठवली.
दरम्यान, गणेश मूर्तीवरून सुरू झालेला वाद हा न्यायालयात पोहचला आहे. आता या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे होनावर कुटुंब आणि सोसायटीचे लक्ष लागले आहे.
याबाबत बोलताना सोसायटीचे अध्यक्ष कल्याण रामायण म्हणाले की, आम्ही जो निर्णय घेतला आहे.तो गणेश मूर्तीच्या विरोधात नाही. आमची देखील बाप्पावर श्रद्धा आहे. त्यांनी बाप्पाची मूर्ती ही घरात बसवावी. ‘आम्ही हे मानतो की आधीच्या लोकांनी कारवाई करायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. आम्ही त्यांना नोटीस तसेच दंड ठोठावला आहे, तो कायदेशीर मार्गाने ठोठावला आहे.