Pune Accident पुणे : नगर – पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर उभ्या असलेल्या पंक्चर डंपरला भरधाव आलिशान कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत कारणे पेट घेतल्याची घटना घडली आहे. एका फायरमनने आपल्या हेल्मेटने गाडीची काच फोडून आतील चालक महिलेला बाहेर काढून तिचा जीव वाचविला.
अग्निशामन दलाने तातडीन घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. ही घटना आगाखान पॅलेस समोरबुधवारी (ता. १९) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार…!
नगर पुणे रोडवर आगाखान पॅलेससमोर एका मालवाहू डंपर पंक्चर झाल्याने उभा होता. नगर रोडने एका आलिशान कारमधून एक महिला भरधाव येत होती. तिने वाटेत एक दोन मोटार सायकलचालकांना धडक दिली. त्यानंतर तिने या डंपरला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरात होती, कारने पेट घेतला. या चालक महिलेला बाहेर पडता येत नव्हते.
त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका प्रशिक्षित फायरमन जवानाने हेल्मेटने चालकांकडील काच फोडली व या महिलेला बाहेर काढले. त्यावेळी ही महिला जवळपास बेशुद्धावस्थेत होती. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका आली. त्यातील डॉक्टरांनी तिला तपासले. तेव्हा तिचा रक्तदाब खाली गेल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. इकडे या घटनेच्या समोरच असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब असलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीची अग्निशमन यंत्रणा वापरुन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग पूर्णपणे विझविली, अशी माहिती अग्निशमन दलाचे कार्यप्रभारी अधिकारी सोपान पवार यांनी दिली. चालक सचिन वाघमारे, फायरमन सचिन जौजळे, संजय कारले, राहुल वडेकर, शरद दराडे आणि अक्षय केदारी यांनी ही आग विझविली.