पुणे : वानवडी येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या पर्दापाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे. या छाप्यात पोलिसांनी महिला व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. तर चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
मसाज सेंटरची व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (वय २७, मूळ रा. पश्चिम बंगाल), सुमीत अनिल होनखंडे (वय २१, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मसाज सेंटरची मालकीण रचना संतोष साळुंखे (रा. येवलेवाडी), सार्थक लोचन गिरमे, लोचन अनंता गिरमे (दोघे रा. वानवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी भागातील साळुंके विहार रस्त्यावरील एका इमारतीत गोल्डन टच स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी मूळच्या छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच महाराष्ट्रातील आहेत.
हि कारवाई अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, नीलम शिंदे, राजश्री मोहिते, सुरेंद्र साबळे, अजय राणे आणि इरफान पठाण यांच्या पथकाने केली आहे.