विशाल कदम
पुणे : लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील एका नामांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दापाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालकासह महिलेवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईत दोन पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
हॉटेल मालक सतीश शेट्टी (वय-५९) याच्यासह एका महिलेच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक फौजदार मारुती गोफणे यांनी सरकारच्या वतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सुदर्शन हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कार्तिक यांनी एक पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पथकाने बनावट ग्राहक बनवून सुदर्शन हॉटेलमध्ये पाठविले. त्यानंतर तेथे तरुणींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली. या प्रकरणी हॉटेल मालकासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, अण्णा बनसोडे, हवालदार मसळे आणि शिंदे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल करत आहेत.