उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन भवरापूर या गावांदरम्यान असणाऱ्या पुलावरून रस्ता ओलांडणारा ३७ वर्षीय तरुण पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
प्रशांत चांगदेव डोंबाळे (वय- ३७, रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे तरुणाचे नाव आहे. त्याचे शोध कार्य सुरू असून घटनास्थळी बुधवारी सकाळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबाळे हे उरुळी कांचन भवरापूर मार्गाने तुटका महादेव मार्गाने ओढ्यावरील कच्च्या पुलावरुन उरुळी कांचन दिशेने चालला होता. मात्र ओढ्यातील पुराचा अंदाज न आल्याने तो पुरात पडला.
घटनास्थळावरून तरुणाची अडकलेली दुचाकी सकाळी १० वाजता आढळली आहे. महापुरात तरुण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात असून रात्री नऊ वाजल्यापासून त्याचा ठावठीकाना लागत नसल्याने प्रशासनाने शोध मोहिम सुरू केली आहे. मंगळवारी रात्री सायंकाळी ५ नंतर वळती व शिंदवणे घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला होता. त्या पावसाचे पाणी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत आले होते.
पावसाचा पूराचा लोट रात्री ८ नंतर उरुळी कांचन ओढ्यावर पडला आहे. ओढ्यात प्रचंड पूराचा लोट आल्याने उरुळी कांचन शहरातील उत्तर भागाला जोडणाऱ्या वाहतुक रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. परंतु या तरुणाने घरी पोहचण्यासाठी पर्यायी रस्ताचा वापर केल्याने हा प्रसंग घडला आहे.
दरम्यान उरुळी कांचन शहरात पूर उद्भवण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्याची पूर्वकल्पना स्थानिकांना संदेशाद्ववारे देण्यात आली होती. परंतु तरुण वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रसंग घडल्याने पूरात वाहून गेल्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. उरुळी कांचन शहरावर पूरपरिस्थिती गोंगावणार म्हणून रात्रभर ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी घेतली होती. जेसीबी मशीन , ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन पूराचा प्रवाह वाट करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन,भवरापूर तंटामुक्ती हनुमंत टिळेकर यांनी दुचाकी वाहन बाहेर काढण्यास यंत्रणा लावली होती.