बारामती : इंदापूर – बारामतीमार्गे सासवडला गांजा विक्रीसाठी घेऊन निघालेल्या एका महिलेसह दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० लाख रुपयांचा ५० किलो गांजा व एक चारचाकी गाडी असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सचिन दिलीप रणवरे (वय – ३५ रा. हिवरकर मळा, सासवड ता. पुरंदर), सुनिता प्रताप चव्हाण (वय – ३५ रा. सणसवाडी ता. शिरुर, मुळ रा माहुरगड ता. पुसद, जि. नांदेड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना शनिवारी (ता. २८) एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर – बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे.
सदरची माहिती वरिष्ठांना कळवून तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत योग्य त्या सूचना देऊन रुई पाटीजवळ रुई गाव येथे रोडवर नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एक चारचाकी गाडी हि रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांना दिसून आली.
त्यानुसार पोलिसांनी सदर गाडीला थांबवून गाडीची तपसणी केली असता गाडीच्या डिक्कीत सुमारे १० लाख रुपयांचा ५० किलो गांजा दिसून आला. पोलिसांनी सचिन रणवरे व सुनिता चव्हाण या दोघांना ताब्यात घेतळे तसेच गांजा व चारचाकी गाडी असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, राहुल घुगे सहायक पोलीस हवालदार साळवे, पोलीस हवालदार राम कानगुडे, सुरेश दडस, अतुल पाटसकर, राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे, आशा शिरतोडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी यांनी केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे करीत आहेत.