लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवणे परिसरात हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून ५ हजार २०० रुपयांची गावठी दारू नष्ट केली. गावठी दारू बनवीत असलेल्या एका महिलेवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरस्वती संतोष राठोड (वय-४०, रा. कंजारवस्ती, शिंदवणे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष शंकर अंदुरे (वय- ४२) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी- शिंदवणे रस्त्यावरील शिवारात काही नागरिक हे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी चालवित आहे.
त्या अनुशंघाने वरिष्ठाच्या आदेशानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, पत्राच्या भांड्यामध्ये गुळ, तुरटी व पाणी या रसायन साहित्याशी गावठी दारू बनवीत असताना वरील महिला आढळून आली. दरम्यान, सदर ठिकाणी असलेल्या मालाची पाहणी केली असता ५ हजार २०० रुपये किमतीचे हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन हजार रुपयांचे पत्र्याचे भांडे असे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस नाईक नागलोत, संतोष अंदुरे, पोलीस अंमलदार संतोष होले यांच्या पथकाने केली आहे.