दौंड (पुणे) : पोलीस हा राज्यसरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावतात. पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत.
मात्र लिंगाळी (ता. दौंड) हद्दीमधील एस.आर.पी.एफ. ग्रुप नं. ७ मध्ये पोलिस कर्मचारीच चक्क दारू पिऊन कर्त्यव्य बजावीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई काय होणार? याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस नाईक संदीप नामदेव साबळे (पोना/९१९ वय-३७ रा- एस आर पी एफ ग्रुप नं-७ रुम नं-६५/३ ५६५ कॉटर्स दौंड ता- दौंड जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस फौजदार शंकर रामचंद्र बसवंतकर (वय- ४०, वर्षे भंदा नोकरी, रा बालाजीनगर दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंगाळी (ता. दौंड) हद्दीमधील एस.आर.पी.एफ. ग्रुप नं. 7 येथे पोलीस नाईक संदीप नामदेव साबळे हे दारू पिऊन (मद्यपान करून) शनिवारी (ता. ७) रोजी ड्युटीवर आले होते. साबळे हे ड्युटीवर आल्यानंतर त्यांनी दारू पिल्याचे पोलीस फौजदार शंकर बसवंतकर यांच्या लक्षात आले.
त्यानंतर बसवंतकर यांनी तातडीने याप्रकणी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी पोलीस नाईक संदीप नामदेव साबळे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम- ८५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.
जर कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी. आशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.