Police News पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळ उडवून देणारी घडना घडली होती. पुण्यात भर दिवसा अशी घटना घडल्याने चांगलेच राजकारण तापले आहे. बड्या राजकीय नेत्यांने राज्यसरकारसह पोलिस प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती. (Police News) पुणे शहर पोलिस खडबून झाले असून या हल्ला प्रकरणी पोलीस हवालदारासह 3 पोलिस कर्मचारी निलंबित करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानंतर आता माथेफिरूंना तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो असा सज्जड इशारा पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. (Police News)
महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले. तर आता पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यावर पोलिसांनी कडक कारवाईचे धोरण ठरवले आहे.
तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुणांनी या तरुणीचा जीव वाचवून तिला पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर तेथे कोणीही पोलिस नव्हते. तेथे ड्युटीवर असलेले दोन्ही पोलिस कर्मचारी नव्हते. घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांवर टीका होऊ लागली.
दामिनी पथकात सध्या १५ दामिनी पथके आहेत. त्यांची संख्या २५ करण्यात आली आहे. एका दुचाकीवर दोन महिला कर्मचारी गस्त घालणार आहेत. शाळा, महाविद्यालये, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच सकाळ आणि सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये १०० बीट मार्शल तैनात करण्यात येणार आहेत. असे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.
घटनेत त्या माथेफिरूने बॅगेमधून कोयता आणला होता. त्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान अशा प्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस चौकीमध्ये पोलिस नसल्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. एरवी रात्रीच्या वेळी बंद असलेल्या पोलिस चौक्या मंगळवारी रात्री उघड्या असल्याचे दिसून आले.
शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होईल. असेही रितेशकुमार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.