बारामती : येथील तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे कारण नमूद करण्यात आले असले तरी या तडकाफडकी बदलीमागे काही वेगळी कारणे असल्याची चर्चा बारामतीत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची बारामतीत जोरदार चर्चा आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारीही प्रशासकीय बदली असल्याचे सांगत असले तरी इतकी तडकाफडकी बदली होण्यामागे नक्कीच दुसरे कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याची दखल घेत ही बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ढवान यांच्या बदलीने बारामती शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
बारामती हे संवेदनशील शहर समजले जाते. स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीच्या बाबतीत बारकाईने लक्ष असते. बारामतीत चुकीचे कसलेच प्रकार ते खपवून घेत नाहीत. अधिकारी किंवा कार्यकर्ते कोणीही असले तरी चुकल्यावर कारवाई करताना अजित पवार मागेपुढे पाहत नाहीत. गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेचीच चर्चा बारामतीत रंगली होती. सुरवातीला दबक्या आवाजात ही चर्चा होती, मात्र नंतर उघडपणे या बाबी बोलल्या गेल्या. वरिष्ठ अधिका-यांपर्यंतही हे प्रकरण पोहोचले होते, प्रारंभी वरिष्ठांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असेच चित्र होते, मात्र नंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने वरिष्ठांनी तडकाफडकी बदलीचा निर्णय घेतला.
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ४ ऑक्टोबरला जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून तसा अहवाल सादर करण्याचेही आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत.
दरम्यान, ढवाण हे २४ सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. त्यांचा पदभार पुणे ग्रामीणच्या डायल ११२ चे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पुढील आदेशापर्यंत तो मोरे यांच्याकडेच राहणार असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या पत्रात म्हटले आहे. बारामतीत अधिका-यांनी काही चुकीच्या बाबी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या चुकीला माफी मिळत नाही हेच या घटनेने अधोरेखीत झाले.