राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या पिकअप मधून ५० हजाराची रक्कम चोरणाऱ्या ४ महिलांना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
नम्रता मुन्ना काळे (रा.राशीन,ता. कर्जत,जि. अहमदनगर), सारिका निलेश काळे (रा. कुळधरण,ता.कर्जत) पद्मिनी शिवाजी भोसले आणि शैला बाळकिसन शिंदे ( दोघीही रा.कोर्टी,ता.करमाळा,जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी वाहन चालक भगवान म्हसाडे (वय ३३ रा.दावडी,ता.खेड,जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान म्हसाडे हे एक वाहन चालक आहेत. ते पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक करतात. म्हसाडे हे शनिवारी (ता.२३) सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने चालले होते. तेव्हा वरील चारही आरोपी महिला त्यांच्या वाहनात प्रवासी म्हणून बसल्या होत्या. चारही महिलांनी पाटस येलूरे पेट्रोल पंपासमोर आल्यावर खाली उतरताना गाडीच्या डीक्कीमध्ये असलेले ५० हजार रुपये चोरी करून पळून गेल्या होत्या. याप्रकरणी म्हसाडे यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी पाठलाग करून वरील चारही महिलांना ताब्यात घेतले आहे.
हि कारवाई यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, सागर चव्हाण आणि पोलीस शिपाई हनुमंत खटके यांच्या पथकाने केली आहे. तरी, पुढील तपास पोलीस हवालदार भानुदास बंडगर करत आहेत.