लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालविणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. हातभट्टीची दारू विक्री करणारी महिला आणि मटका जुगार चालविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महेश ऊर्फ तंड्या रामचंद्र चव्हाण (वय ४२) आणि संगीता तानाजी भाले (वय ४८, दोघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश ऊर्फ तंड्या चव्हाण याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. तर संगीता भाले हिच्याविरुद्धही अवैध दारू विक्रीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही दोघांनी आपले अवैध धंदे सुरूच ठेवल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दोन्ही आरोपींच्या गुन्हेगारी अभिलेखांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

दरम्यान, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सराईत आरोपींवर ठोस कारवाई करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये दोघांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश उपयुक्त जीवन बेनिवाल यांनी दिले आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल आणि लोणी काळभोर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप, पोलीस हवालदार विलास शिंदे, स्वाती पिसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







