लोणी काळभोर (पुणे)- न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी एका व्यक्तीकडुन दोन हजाराची लाच स्विकारणारे लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील हवालदार व त्यांच्यासाठी झिरो म्हणुन काम करणारा होमगार्ड अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. 31) सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
मुकुंद शंकर रणमोडे (वय-49, पोलीस हवालदार, लोणी काळभोर पोलिस ठाणे) व त्यांचा सहकारी होमगार्ड, गजेंद्र माणिक थोरात (वय 35, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती) ही त्यांची नावे असुन, लोणी काळभोर परीसरातील एका व्यक्तीकडुन रणमोडे यांच्या वतीने गजेंद्र थोरात हे लाचेची रक्कम स्विकारत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरील दोघांना ताब्यात घेतले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयीन तारखेला वारंवार गैरहजर राहत असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने लोणी काळभोर परीसरातील एका व्यक्तीला अजामीनपात्र वॉरंट काढले होते. या वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी मुकुंद रणमोडे यांनी सदर व्यक्तीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोड होऊन, बुधवारी सकाळी पाचपैकी दोन हजार रुपये घेतांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरील दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक राजमाला पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान पोलीस , महसुल विभाग अथवा कोणत्याही सरकारी कर्मचारी म्हणजेच लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शनकडे तक्रार द्यावी असे आवाहन पुणे अॅन्टी करप्शनकडून करण्यात आले आहे.
न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट, पोलिसासाठी ठरतेय कमाईचे साधन…
न्यायालयात खटला चालु असणारी व्यक्ती न्यायालयीन तारखेला वारंवार गैरहजर राहत तर, अशा व्यक्तींना न्यायालयात हजर ठेवण्यासाठी न्यायालयाकडुन वारंवार गैरहजर राहणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाते. अजामीनपात्र वॉरंट म्हणजेच पोलिसांनी संबधित व्यक्तीला अटक करुन, न्यायालयात हजर करणे न्यायालयाला अपेक्षित असते. मात्र पोलिस याचाच गैरफायदा घेत, अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी पाच हजारापासुन पंचवीस हजार रुपयापर्यंत रकमा घेऊन चांगलीच वर कमाई करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ताब्यात घेतलेले मुकुंद रणमोडे वरील प्रकरणात तर माहिर असल्याचे किस्से लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चर्चीले जात आहेत. दोन महिण्यापुर्वी लोणी काळभोर हद्दीत झालेल्या लोकअदालतमध्ये जाहीर झालेल्या खटल्यात, तब्बल अकरा जणांची अटक टाळण्याच्या नावाखाली मुकुंद रणमोडे हजारो रुपये कमवले होते. याबाबत वरीष्ठांनी त्यांची खरडपट्टीही काढली होती.