Pimpri News : पिंपरी : शहरातील बेकायदा नऊ रूफटॉप हॉटेलवर महापालिका प्रशासनाने चार दिवसांत हातोडा मारल्याची माहिती सहायक आयुक्त विजय सरनाईक यांनी दिली. नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेलना अधिकृत परवानगी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेकायदेशीर रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली जाणार
शहरातील खवय्ये व मद्यपी रूफटॉप हॉटेल ला प्राधान्य देतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, थेरगाव या भागांत रूफटॉप हॉटेलची संख्या वाढत आहे. अनेकदा इमारतीच्या गच्चीवर कोणतीही परवानगी न घेता हॉटेल बेकायदेशीरपणे चालविले जातात. त्याठिकाणी मोठमोठे किचन असतात; मात्र, त्यासाठी आवश्यक ते परवाने घेतले जात नाहीत. हॉटेलमालक अशी अनधिकृत हॉटेल बांधकामे अधिकृत करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सेटींग लावताना दिसतात. यामुळे प्रशासनावर टीका होत असून, बेकायदेशीर रूफटॉप हॉटेलवर कारवाईस सुरुवात झाली आहे.
त्यानुसार ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सात, तर ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत दोन अशा नऊ हॉटेलवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील काही हॉटेलचालकांकडे महापालिकेचा बांधकाम परवाना, अग्रिशमन विभागाचा ना-हरकत दाखला नाही. तसेच, महापालिकेचा बिगरनिवासी मिळकतकरही भरला जात नाही. त्यामुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील विविध भागांत ४८ रूफटॉप हॉटेल असल्याची माहिती अग्निशमन विभागाने गेल्या महिन्यांत दिली होती. आता मात्र ड आणि ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्येच रूफटॉप हॉटेल असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातच २१ रूफटॉप हॉटेल आढळून आले आहेत. या बेकायदेशीर असलेल्या रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली जाणार आहे.