Pimpri News : पिंपरी-चिंचवड : ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना एकापाठोपाठ एक अशा तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ८) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात ३ स्कूल बस जळाल्या. गॅस रिफिलिंग करताना हा स्फोट झाल्याचे उघड झाले होते. या गॅस स्फोट प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pimpri News) याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्या परिसरात ही घटना घडली तिथे कॉलेज, शाळा आहेत. दिवसा घटना घडली असती तर शेकडो जण जखमी झाले असते. हा धोका माहिती असताना देखील आरोपी महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार या दोघांनी तिरुपती कॅरिअर नाव असलेला गॅस टँकर (जीजे १६/एडब्ल्यू ९०४५) चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत करून प्रोपिलिन गॅसची बेकायदेशीरपणे चोरी केली. गॅस सिलेंडरमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात आग लागून स्फोट झाला.
दरम्यान, गॅस चोरी करत असताना आग लागली. मोठा स्फोट झाला. यामध्ये स्कूल बस तसेच इतर वाहनांचे नुकसान झाले आहे. जागा मालक चंद्रकांत सपकाळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. याबाबत जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७, स्फोटक पदार्थ अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri News) घटना घडल्यानंतर टँकरचालक पळून गेला आहे. पोलिसांनी अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
ताथवडे भागात गॅस माफिया चालतो का?
दरम्यान, घटनेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. ते म्हणाले की, पुण्यातील ससूनमधून ड्रग्स माफिया चालते, त्याच पद्धतीने पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे भागात गॅस माफिया चालतो का? असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. (Pimpri News) या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीचे माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
Pimpri News : “राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण अत्यावश्यक!” : पद्मश्री रमेश पतंगे