पिंपरी : शहर आणि परिसरात कोयता गॅंगची दहशत वाढत आहे. सगळ्यांनी मला घाबरुन रहायचे, मला सलमान भाई म्हणतात. आताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे. सर्वांनी मला हप्ता द्यायचा, नाही तर एकेकाला तोडून टाकीन, अशी धमकी देत, हातामध्ये धारदार कोयता घेऊन रस्त्यावरील नागरिकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या गुंडाविरोधात पिंपरीगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सलमान शेख (वय ३०, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक प्रकाश बहादूर शहा (वय २४, रा. पिंपरीगाव) याने पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान हा हातामध्ये धारधार कोयता घेऊन रस्त्यावर आला. मला सलमान भाई म्हणतात. आताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे. सर्वांनी मला हप्ता द्यायचा, नाही तर एकेकाला तोडून टाकीन अशी धमकी देत फिरत होता. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर तो धाऊन जात होता.
दरम्यान, शेख कोयता घेऊन अंगावर येताच फिर्यादी प्रकाश घाबरुन लपून राहिले. यामुळे त्यांचा जीव वाचला. सलमान शेख याच्या दहशतीला घाबरुन परिसरातील लोक जीव मुठीत धरुन धावत होते.