पिंपरी : पोलंडवरून सोने, हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम पाठवली असून ते कस्टममधून सोडवून घेण्यास वेगवेगळ्या बँक खात्यात वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली ११ लाख ४९ हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सिंग, प्रकाश व एक महिला (संपूर्ण नाव व पत्ता महिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलिसात पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीशी इंस्टाग्रामद्वारे मैत्री करून विश्वास संपादन केला. व्हॉट्सॲपवर मेसेज करून तुझ्यासाठी पोलंडवरून सोने व हिऱ्याचे दागिने तसेच रोख रकमेचे पार्सल पाठवल्याचे सांगितले.
ते कस्टममधून सोडवून घे असे सांगून महिला आरोपी व प्रकाश यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात या पार्सलची कस्टम ड्यूटी, हायकोर्ट, मनी लॉन्डरिंग, पोलिस व्हेरिफिकेशन, ट्रान्स्फर चार्जेस, इन्शुरन्स, स्टॅम्प चार्जेसच्या नावाखाली एकूण ११ लाख ४९ हजार रुपये ऑनलाइन भरण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे पार्सल न देता फसवणूक केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.