पिंपरी, (पुणे) : मोशीतील इंद्रायणी नदीत बुडालेल्या दोघांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. ४८ तासांपासून त्यांचा शोध सुरू होता.
शक्तिमान कुमार (वय – २०) सोनू कुमार बैठा (वय २०) असे मृतदेह मिळून आलेल्या दोघांची नावे आहेत. शनिवारी दुपारी शक्तिमान कुमार व सोनू कुमार हे दोघे जण इंद्रायणी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील इंद्रायणी नदीमध्ये शनिवारी दोघे तरुण अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान ते नदीपात्रात बुडाले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या दोघांचा शोध घेतला.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले. मात्र सायंकाळ पर्यंत बुडालेल्या तरुणांचा शोध लागला नव्हता. सोमवारी अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा शोध सुरू केला. सायंकाळी दोघांचे मृतदेह आढळले. जवानांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत.