पुणे : चौफुला- शिरूर रोडच्या बाजूला असलेल्या पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अतिशुध्द मद्यार्कची (शुद्ध अल्कहोल) तस्करी करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी मंगळवारी (ता. २६) अटक केली आहे.
सुरिंदरसिंग मेला सिंग (वय-४७ रा. तहसील के आमपुर अजनाला, जिल्हा अमृतसर, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ३० लाख रुपयांचा टँकर, व ३९ हजार लिटर रुपयांचा २३ लाख ९४ हजार ४८० रुपयांचा अतिशुध्द मद्यार्क असा ५३ लाख ९४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २६) राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ च्या पथकाला एका खबऱ्याकडून अतिशुध्द मद्यार्कची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने पथकाने सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता अतिशुध्द मद्यार्काची (ENA) तस्करी होताना दिसून आले.
सदर ठिकाणी एक इसम टँकरमधून अतिशुध्द मद्यार्क (ENA) रबरी पाईपद्वारे प्लॅस्टिक बॅरलमध्ये भरतांना सदर इसमास जागीच पकडले. सदर ठिकाणी तपासणी केली असता करमधून २०० लिटर क्षमतेच्या ०४ प्लॅस्टिक बॅरल अंदाजे ८०० लिटर एक बॅरल, अतिशुध्द मद्यार्क (ENA), २० लीटर क्षमतेचे २४ प्लॅस्टिक जार पाण्याचे भरलेले व इतर साहित्य असा एकूण किंमतीचा ५३ लाख ९४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान, आरोपीला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक सी. बी. राजपुत, उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे या पथकाने केली. सदर कारवाईत निरीक्षक तानाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे, योगेंद्र लोळे, सर्वश्री जवान एस. बी. मांडेकर, के. आर. पावडे, जी. बी. वाव्हळे, एन. जे. पडवळ, एस. पी. धुर्वे, टी. एस. शिंदे, आर. टी. पोटे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे करीत आहेत.