राजकोट : सुमारे १०० महिलांचा विनयभंग करणाऱ्या पैलवानाला राजकोट येथील मालवीयनगर पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. एका योगा शिक्षिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली.
कौशल पिपालिया असे या आरोपीचे नाव असून त्याने २०१६, १७, १८ आणि २०१९ साली राज्य स्पर्धेत ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. योगा शिक्षिकेने तक्रार केल्यानंतर आरोपी १० दिवस पोलिसांना गुंगारा देत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने दुचाकी पार्क केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी आरोपी बसला होता. दुचाकी पार्क केल्यानंतर लिफ्टने वर जात असताना आरोपी अचानक समोर आला व त्याने लिफ्टचा दरवाजा अडवला. त्यानंतर पॅन्ट काढून आरोपीने अश्लील हावभाव केले. त्यानंतर महिलेने त्याला फटकारत लिफ्टच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने पीडितेच्या कानशिलात लावून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड सुरु केल्यानंतर आरोपीने पळ काढला.
याप्रकरणावर बोलताना मालवीयनगरचे पोलीस निरीक्षक आय. एन. सावलिया म्हणाले, आरोपीने सुमारे १०० महिलांचा विनयभंग केल्याचे कबुल केले असून यामुळे त्याला विकृत आनंद मिळत होता.
आरोपी गाडी चालवताना महिलांच्या कानशिलात लगावत पळ काढण्यासाठी कुप्रसिद्ध होता. तसेच यापूर्वी देखील त्याला चोरी आणि शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत अटक करण्यात आली होती.