लोणी काळभोर (पुणे) : राष्ट्रवादी कार्यकर्त्याकडून कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील महिला सरपंचास मारहाण केल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर प्रकरणास कलाटणी मिळाली असून उलट महिला सरपंच गौरी गायकवाड व इतरांनीच मिळून सुजित काळभोर यास मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सुजित काळभोर यांची पोलिसांनी दखल न घेतल्याने अँड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सुजित काळभोर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी सुजित काळभोर इतर दोन प्रत्यक्ष साक्षीदार यांना शपथेवर न्यायालयाने तपासणी करून न्यायिक दखल घेऊन खटला चालवण्याचे आदेश गुरुवारी (ता. ०३) दिल्याने कदमवाकवस्तीसह लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सरपंच महिला ही लोकप्रतिनिधी असताना देखील तिने केलेले कृत्य हे प्रथमदर्शनी गुन्हा असल्याने आरोपी महिला सरपंच गौरी गायकवाड, सचिन काळभोर महेश काळभोर, अमोल काळभोर, अविनाश पप्पू बडदे, चित्तरंजन गायकवाड, या सर्व आरोपी यांच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांनी खटला चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
फिर्यादी सुजित काळभोर यांचे वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी खटला दाखल केला होता. त्यांना अॅड निलेश वाघमोडे अॅड. आशुतोष शेळके अॅड. अक्षय खडसरे यांनी सहाय्य केले.
काय आहे प्रकरण :
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ३ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य विभागाच्या वतीने एंजल हायस्कूल, माळवाडी जिल्हा परिषद शाळा व कदमवस्ती जिल्हा परिषद शाळा येथे कोविड-१९ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण सुस्थितीत पार पाडण्यासाठी सरपंच गौरी गायकवाड या एंजल हायस्कूल, संभाजीनगर येथे उपस्थित होत्या. ११ वाजण्याच्या सुमारास सुजित काळभोर हा तेथे आला. त्यावेळी तेथे उपस्थित असणारा अविनाश ऊर्फ पप्पू बडदे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
सुजित काळभोर याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळी लसीकरणासाठी गेला असता पप्पू बडदे त्याला तू थांब म्हणाला यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर तेथे सरपंच गौरी गायकवाड आल्या त्यांनी कानशिलात लगावल्याने हाणामारी झाली. हे पाहून तेथे सचिन अरविंद काळभोर, महेश ज्ञानेश्वर काळभोर हे आले व सर्वांनी त्यास हाताने मारहाण सुजित काळभोर यास मारहाण केली होती.