पुणे : देहूरोड येथे अल्पवयीन विद्यार्थिनी दारू विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी काढला असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट असल्याचे दिसून आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड येथे राजरोसपणे अवैद्यधंदे, गावठी दारूचे अड्डे सुरूच आहेत. देहूरोडच्या माकड चौक, शिवाजी चौक, एमबी कॅम्प या ठिकाणी देहूरोडच्या महिला पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रामेशन यांनी केला आहे. श्रीजित रामेशन यांनी तीन ठिकाणच्या गावठी दारू अड्ड्यांवर काही व्यक्ती पाठवून व्हिडिओ काढण्यास सांगितले होते. त्यात धक्कादायक बाब म्हणजे एक अल्पवयीन विद्यार्थिनीच चक्क दारू विकताना दिसत आहे.
दरम्यान, पोलिसांचा अवैध धंद्याविषयी धाक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. दारू अड्ड्यावर अशा प्रकारे एक अल्पवयीन विद्यार्थिनी दारू विकते आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्ती हे गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यसन करणारे असू शकतात आणि काही ही घडू शकते. असा प्रश्न श्रीजित रामेशन यांनी उपस्थित केला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ यावर ऍक्शन घेणे गरजेचे असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले कि, या व्हिडीओ बाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. यात तथ्य आढळल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.