पुणे : जेवणाचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नातेवाइकाचा खून करून मृतदेह बोपदेव घाटात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
किरण भागवत थोरात (वय. २६, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. धनंजय हरिदास गायकवाड (वय. २३, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हरिदास गायकवाड (वय.५०, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, धनंजय गायकवाड व किरण थोरात हे नातेवाईक आहेत. जेवण्याच्या बिलावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यावरून धनंजय किरणला जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर सोमवारी (ता.१२) रोजी दारू पिऊन किरणच्या घरी गेला आणि त्याच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता.
दरम्यान, आरोपी किरण याने त्याला गोड बोलून झाले गेले विसरून जा, मी तुला पैसे देतो, दारू पाजतो, असे सांगितले. त्यानंतर त्याच्या दुचाकीवरून दारू घेऊन त्याला बोपदेव घाटाच्या शेवटच्या टोकाला नेले. आणि आरोपी किरणे धनंजय याच्या डोक्यात, छातीवर घाव घालून खून केला. तेथून त्याला ओढत दरीत ढकलून दिले. त्याची गाडीही ढकलून दिली.
यानंतर, कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकणी फिर्याद देण्यात आली. खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर किरण थोरात हा चिंचवड येथे लपला असल्याची माहिती युनिट १ च्या पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणाहून युनिट १ च्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.