पुणे : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीच्या चिरडण्याची घटना चंदननगर येथील जुना मुंढवा रस्त्यावर ७ जून रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली होती. तब्बल पाच महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉक्टर महिलेवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्लाबक्ष अन्वर शेख (वय ४२, रा. येरवडा) असे मृत्यु झालेल्या इसमाचे नाव आहे. डॉ. अश्विनी आदित्य साळुंखे (रा. मार्वल झेटा सोसायटी, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील रिलॅक्स पॉईंट हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला अल्लाबक्ष हा ७ जून दारु पिऊन झोपला होता. तेव्हा आरोपी डॉ. अश्विनी यांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार रिव्हर्स घेताना अल्लाबक्ष यांच्या अंगावरून गाडी घातली. अंगावरुन अज्ञात वाहन गेल्याने त्याचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अल्लाबक्ष यांची अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन पोलीस तपास करीत होते.
दरम्यान, तपास करीत असताना पोलिसांना अल्लाबक्ष शेख हा रस्त्याच्या कडेला झोपला होता. तेव्हा डॉ. साळुंखे या त्यांची कार रिव्हर्स घेत असताना मागे झोपलेल्या शेख याच्या अंगावर गेली. त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. मृत्युस कारणीभूत ठरल्याने डॉ. अश्वीनी साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.