पुणे : सोलापूर रोडवरुन चाकणला जात असताना रस्ता चुकल्याने दोन कंटेनरचालकांमध्ये झालेल्या वादातून एका चालकाने दुसर्या चालकाला गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना तुळापूर ते लोणीकंद रोडवरील सिताईचे समोर गुरुवारी (ता.२६) सायंकाळी ५ वाजता घडली आहे. लोणीकंद पोलिसांनी ट्रकचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
शमशुल अलीअहमद खान (वय २६, रा. चायकला, थाना दुधारा, जि. खल्लाबाद, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. तर, शहजाद अब्दुलक्युम अहमद (वय २६, रा. पोखर भिटवा पो. बिशुनपुरवा, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी संजय रामफल कालीरामना (वय ४१, रा. वलसाड, गुजरात) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शमशुल खान आणि शहजाद अहमद तामिळनाडु धर्मपुरी येथून माल घेऊन कंटेनर चाकणला येत होते. सोलापूर रोडवरुन चाकणसाठी ते वळल्यानंतर एका ठिकाणी त्यांना बॅरिकेट लावलेले दिसले. त्यामुळे ते रस्ता चुकून दुसरीकडे गेले. तुळापूर येथे गेल्यावर त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. रस्ता चुकल्याने लांबचे वळण घ्यावे लागणार, त्यामुळे जादा खर्च आला, यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यात आरोपी खान याने अहमद याला मारहाण करून त्याचा गळा दाबला.
आरोपी खान याने तेथेच असलेला लोखंडी रॉड अहमद याच्या डोक्यात मारला. त्यानंतर अहमद हा निपचित पडला. अहमदचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर खान याने त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून तो पळून गेला. कडेला कंटेनर इतके दिवस का थांबला, हे पाहिल्यावर त्यात पोलिसांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी त्या कंटेनरच्या मालकाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी दोन चालक असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन खान याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने अहमद याने आपल्याला वाटेत उतरुन दिले. त्यानंतर तो पुढे निघून गेल्याचे सांगितले.
दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी सोलापूर रोडवरील सर्व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासले. त्यात खान हा कंटेनरमध्येच असल्याचे दिसून आल्याने पुन्हा त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने अहमद याचा खून केल्याचे कबूल केले. शमशुल खान याला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.