तुषार सणस
भोर, (पुणे) : पुणे-सातारा महामार्गावरील दोन्ही जिल्ह्याला जोडणारा नीरा नदी पुल हा सुसाईड पॉईंट म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या ठिकाणी संरक्षण भिंत असून, देखील आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढच होत आहे. पुलाच्या मध्यभागी जागा मोकळीच असल्याने आत्महत्येच्या संख्येत भर पडली आहे.
नीरा नदी पुलावर मंगळवारी (दि. ०८) गाडी आढळून आली होती. या संदर्भात चौकशी केली असता ही गाडी निलेश महादेव काकडे (वय ४० वर्ष रा.पुणे) यांची असून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला होता. घरगुती वाद झाल्याने ते आपल्या मेहुण्याच्या घरी राहण्यास गेले होते. तेथून पुणे येथे कंपनीत जातो, असे सांगून ८ ऑगस्टला निलेश घरातून निघून आले होते. त्यानंतर त्यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही, असा नातेवाईकांनी खबरी जबाबही राजगड पोलीस स्टेशनमध्ये दिला होता.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या ठिकाणी राजगड पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स व शिरवळ प्रतापगड रेसक्यू टीम, शिरवळ रेसक्यु टीम शोध घेत होती. शोध मोहीम जवळजवळ ७२ तास सुरू होती. अथक परिश्रम घेतल्यानंतर निलेश काकडे यांचा मृतदेह आज (दि .११) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नीरा नदी पुलापासून दहा किलोमीटर लांब मिळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर रूग्णालय येथे पाठविला आहे.