पुणे : मुंबई – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर रविवारी (ता.२०) एकापाठोपाठ ३ वेगवेगळे विचित्र अपघात झाले आहेत.
पहिल्या घटनेत टँकरने ४८ वाहनांना धडक दिली तर दुसऱ्या घटनेत टेम्पोने ७ वाहनांना धडक दिली. अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ७० हुन अधिक जण जखमी झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – बंगळूर महामार्गावर साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा ब्रेकफेल झालेला एक भरधाव ट्रक आला आणि त्याने सुमारे ४८ वाहनांना रविवारी (ता.२०) रात्री साडे आठच्या सुमारास टक्कर मारली. यातील काही वाहनांना हा ट्रक सुमारे ५० ते ६० मीटरपर्यंत ओढत घेऊन गेला.
एवढा गंभीर अपघात होऊन देखील सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी प्रवाशांना तातडीने आजूबाजूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत मध्यरात्री नवले पूल परिसरात स्वामी नारायण मंदिराजवळ भरघाव टेम्पोने सात वाहनांना धडक दिली. अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातामुळे नवले पूल परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी झाली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस, अग्निशामक दल, तसेच पीएमआरडीएचे अग्निशामक दल, रेस्क्यू वाहने दाखल झाले. या अपघाताने संपूर्ण वहातुक ठप्प झाली होती मात्र, पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे. अपघातस्थळी ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात अपघात ग्रस्तांची मदत केली असून अनेक जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल केले आहे.
यापूर्वी देखील अपघातांची मालिका
यापूर्वी देखील नवले पुलावर अपघातांची मालिका सातत्याने सुरूच होती. मागील वर्षभरात अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.
येथील स्थानिक नागरिकांनी यापूर्वी देखील या भागात असणाऱ्या तीव्र उतारावर आक्षेप घेताना उतार कमी करण्याची, रम्बल स्ट्रीप्स, सुरक्षा फलक, आदी गोष्टीच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
त्यानुसार महामार्ग विभागाने स्पीडगन, कॅमेरे देखील बसवले आहेत. तरी देखील काल झालेल्या अपघातांने येथील नागरिक या संदर्भात पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात पुणे महानगरपालिका, आमदार, खासदार तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदने दिली होती. मात्र, कालच्या अपघाताने अनेक पुलाच्या निर्मितीतील चुका स्पष्ट झाल्या आहेत.
खासदार सुळे थोड्याच वेळात नवले पुलाच्या भेटीला
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे थोड्याच वेळात अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण यांनी कळविले आहे.
नवले पूल हा खडकवासला मतदारसंघात येत असून सुळे यांनी यापूर्वी देखील नवले पुलाच्या संदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली होती.