पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १३ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अब्दुल महंमद शेख (वय – १९, रा. भारत नगर, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरी, जबरीच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी हद्दीत गस्त वाढवण्याच्या सुचना कोंढवा पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार बनसूडे व मदन यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हा इस्कॉन मंदिराजवळ थांबला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून जबरी चोरीचे २, वाहन चोरीचे ६ आणि घरफोडीचे ५ गुन्हे असे १३ गुन्हे उघडकीस आणून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९, वानवडी, चतुश्रुंगी, हडपसर आणि सासवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, अंमलदार चव्हाण, देसाई, पवार, चिनके, होळकर, बनसुडे, भोसले, मदन, शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.