पुणे : पुण्याहून गणपतीपुळ्याला निघालेल्या भाविकांचा सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झाला आहे. वारणा नदीवर असलेल्या कोकरुड- नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने वडिलांचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात कराड – रत्नागिरी राज्य महामार्गावरील कोकरुड येथे झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, ऋषिकेश घोगरे (वय २३, रा. डालज, ता.इंदापूर, जि. पुणे) हे कार एमएच ४२ एएक्स ७३७२ घेऊन पत्नी रेणुका, चुलत भाऊ महेंद्र, रुपाली, आरव व शिवेंद्र हे सर्वजण सकाळी पुण्यावरून गणपतीपुळे, रत्नागिरी येथे देवदर्शनाकरिता निघाले होते.
दुपारी कोकरूड येथील वारणा नदीवरील कोकरूड-नेर्ले पुलाजवळ आले असता ऋषिकेश याचा कारवरील ताबा सुटल्याने पुलाच्या संरक्षण कठड्याला कारची जोरदार धडक झाली. यामध्ये बापलेकांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
महेंद्र अशोक घोगरे (वय 35), आरव महेंद्र घोगरे (वय 4, बावडा -वकिलवस्ती, जि. पुणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. रुपाली महेंद्र घोगरे, शिवेंद्र महेंद्र घोगरे व रेणुका ऋषिकेश घोगरे अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये चालकाच्या बाजूस बसलेले महेंद्र आणि आरव हे जागीच ठार झाले.
पाठीमागे बसलेले रुपाली, रेणुका व शिवेंद्र हे जखमी झाले आहे. जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.